Blog

Personal Reflection

नाना… पडद्यावरच्या प्रेरणेपासून आयुष्यभराच्या नात्यापर्यंत… 🙏

Mandar Joglekar
नाना पाटेकर आणि मंदार जोगळेकर एकत्र
नानांसोबत जपलेला एक खास क्षण.

काही माणसं आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष येतात. काही एखाद्या पुस्तकातून, गाण्यातून किंवा चित्रपटातून आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. आपण कोण आहोत, हेही त्यांना माहीत नसतं. पण नकळत ते आपल्या आयुष्याची दिशा बदलून जातात.

नाना पाटेकर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आले ते चित्रपटाच्या पडद्यावरून.

पण माझी ही गोष्ट खरं तर त्याही आधी, १९८३ मध्ये साखरप्यात आलेल्या एका पुरापासून सुरू होते.

मी रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या छोट्याशा गावात वाढलो. माझे वडील भारतीय सैन्यात होते. निवृत्तीनंतर त्यांनी गावात एक छोटंसं किराणा दुकान सुरू केलं होतं. १९८३ मध्ये आलेल्या पुरात ते दुकान एका रात्रीत वाहून गेलं.

आमच्या कुटुंबासाठी तो मोठा आर्थिक धक्का होता.

त्या वेळी मी लहान होतो. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं की त्या पुरानं माझ्या पुढच्या आयुष्याची दिशा बदलली.

१९९१… पुणे, विद्यार्थी सहाय्यक समिती आणि ‘प्रहार’

दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आलो. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहात राहू लागलो. समितीचे कार्यकर्ते, विश्वस्त, देणगीदार आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेमुळे माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला पुढे शिकण्याची संधी मिळाली.

पण साखरपासारख्या छोट्या गावातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यावर इथल्या स्पर्धात्मक वातावरणाशी जुळवून घेणं मला अवघड जात होतं.

आत्मविश्वास ढासळला.

एक वेळ अशी आली की,

“आपल्याला हे जमणार नाही. शिक्षण सोडून साखरप्याला परत जावं,”

असा विचार मी करू लागलो.

आणि नेमक्या त्याच काळात आयुष्यात पहिल्यांदा थिएटरमध्ये चित्रपट पाहिला.

‘प्रहार’.

पडद्यावर नाना पाटेकर.

माझे वडील सैन्यात असल्यामुळे असेल किंवा त्या वेळी माझी मानसिक अवस्था तशी असल्यामुळे असेल, पण प्रहारमधील नानांची भूमिका मनात खोलवर उतरली.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तिच्याशी लढायचं. पळून जायचं नाही.

चित्रपट संपला.

पण माझ्यासाठी काहीतरी नवीन सुरू झालं.

पुणं सोडून परत जाण्याचा विचार मी सोडला.

‘प्रहार’ माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला.

आणि मी नानांचा जबरदस्त चाहता झालो.

आणि एक दिवस नाना खरंच आमच्यासमोर उभे राहिले…

पुढे मी विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा Gathering Secretary झालो.

माझ्या डोक्यात एक वेडी कल्पना आली,

“आपल्या कार्यक्रमाला नाना पाटेकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं तर?”

मित्र म्हणाले, नाना एवढे मोठे स्टार… त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं? आणि पोहोचलो तरी ते आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला येतील का?

तेव्हा कळलं की आमच्या विश्वस्त निर्मलाताई पुरंदरे यांच्याबद्दल नानांच्या मनात खूप आदर होता. ते त्यांना ‘आई’ म्हणायचे.

मी निर्मलाताईंना माझी गोष्ट सांगितली. प्रहारनं मला शिक्षण सोडण्यापासून कसं परावृत्त केलं, हेही सांगितलं आणि नानांना आमंत्रण देण्याची विनंती केली.

आणि आमच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही…

नाना आले!

पडद्यावरचे करारी, आक्रमक नाना आणि प्रत्यक्ष भेटलेले नाना यात जमीन-अस्मानाचा फरक होता.

अत्यंत साधे. मनमोकळे. आपलेसे.

जणू आमच्यातलेच एक.

मी त्यांना माझी सगळी गोष्ट सांगितली. साखरपा, कुटुंबाची परिस्थिती, पुणं, समिती, शिक्षण सोडण्याचा विचार आणि प्रहारमुळे झालेला बदल…

ते शांतपणे ऐकत राहिले.

माझे वडील भारतीय सैन्यात होते, हे कळल्यावर त्यांना विशेष आनंद झाला.

प्रतिकूल परिस्थितीशी लढत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

नानांसाठी कदाचित तो एका विद्यार्थ्यासोबत झालेला छोटासा संवाद असेल.

पण माझ्यासाठी ती आयुष्यभराची शिदोरी होती.

२००९… जवळजवळ वीस वर्षांनी!

आयुष्य पुढे गेलं.

साखरपा ते पुणे आणि पुढे अमेरिका…

२००९ मध्ये फिलाडेल्फियामध्ये होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी आम्हाला नानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं होतं.

पुन्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला.

जवळजवळ वीस वर्षं झाली होती. मी माझी ओळख सांगू लागलो…

समिती…

निर्मलाताई…

तो कार्यक्रम…

पण मला आश्चर्याचा धक्काच बसला.

नानांना मी आठवत होतो!

वीस वर्षांपूर्वी भेटलेला एक सामान्य विद्यार्थी त्यांच्या लक्षात होता.

त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि फिलाडेल्फियाला आले.

आणखी एक गोष्ट मला कायम लक्षात राहिली.

त्यांनी स्वतःसाठी मानधन घेतलं नाही.

ते पैसे त्यांच्या आवडत्या एका सेवाभावी संस्थेला दान करावेत, असं त्यांनी सांगितलं.

पुढे नानांना जवळून ओळखताना मला वारंवार जाणवलं की त्यांनी अनेक माणसांना, अनेक संस्थांना मदत केली.

पण त्याचा गाजावाजा करून स्वतःचं नाव पुढे आणणं हा त्यांचा स्वभाव नव्हता.

BMM 2009 Philadelphia च्या स्वागतप्रसंगी नाना पाटेकर आणि आयोजक
BMM 2009, Philadelphia: नानांच्या स्वागताची आठवण.

न्यूयॉर्क ते फिलाडेल्फिया… आणि एक साधं सँडविच!

नाना अमेरिकेत आले तेव्हा न्यूयॉर्क विमानतळावरून फिलाडेल्फियापर्यंत मी स्वतः गाडी चालवत त्यांना घेऊन जात होतो.

लांबचा विमानप्रवास करून आलेले नाना त्या दोन-तीन तासांत माझ्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यात अधिक उत्सुक होते.

“साखरप्याचा हा मुलगा फिलाडेल्फियापर्यंत कसा पोहोचला?”

आमच्या खूप गप्पा झाल्या.

प्रवासात नानांना भूक लागली.

मी विचार करू लागलो,

“आता एवढ्या मोठ्या स्टारला कोणत्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं?”

पण नानांनी प्रश्नच संपवला.

त्यांना कुठेही साधं खायला काहीच हरकत नव्हती.

आम्ही थांबलो आणि साधं सँडविच घेतलं.

लोक त्यांना ओळखत होते. फोटो, ऑटोग्राफ घेत होते. आणि नाना प्रत्येकाशी सहजपणे वागत होते.

त्या दिवशी आणखी एक धडा मिळाला.

मोठं होण्यासाठी मोठेपणाचा आव आणावा लागत नाही.

प्रवासात सँडविच खाताना नाना पाटेकर आणि मंदार जोगळेकर
न्यूयॉर्क ते फिलाडेल्फियाच्या प्रवासातला साधा सँडविच आणि मनमोकळ्या गप्पा.

२०१२… कार्डिफ

२०१२ मध्ये युरोपियन मराठी संमेलनाच्या निमित्ताने कार्डिफमध्ये पुन्हा भेट झाली.

नानांची एक खास मागणी असायची,

“ चांगले जिम असलेलं हॉटेल बघा.”

साठीनंतरच्या वयातही त्यांचा व्यायाम आणि फिटनेस पाहून मी थक्क व्हायचो.

आणि माझ्यासाठी त्यांचा खास फिटनेस सल्ला असायचा!

माझं पोट पकडून,

“जिम कर जरा… चरबी कमी कर!”

असं सांगायचे.

त्या चेष्टेमध्येही एक वेगळी आपुलकी होती.

घरातले नाना…

गणपतीच्या दिवसांत मी त्यांच्या घरीही जात असे.

गणपतीची सजावट करण्याची त्यांना खूप आवड होती. ते स्वतः त्यात मनापासून रमायचे. अनेक लोक त्यांच्या घरी गणपतीसाठी येत असत.

तिथे एक वेगळाच नाना पाहायला मिळायचा.

नाना उत्तम स्वयंपाकही करायचे.

आणि त्यांच्या हातचा खास चहा!

तो ते स्वतः घरी बनवायचे.

देशभर ओळखला जाणारा सुपरस्टार आपल्या घरात स्वतः चहा बनवत आहे आणि आपण तो चहा पीत निवांत गप्पा मारत आहोत…

अशा वेळी अभिनेता, सेलिब्रिटी, सुपरस्टार हे सगळं मागे पडायचं.

समोर फक्त ‘नाना’ असायचे.

नाना… एक उत्तम कवीसुद्धा!

नानांचा आणखी एक पैलू अनेकांना कदाचित माहीत नसेल.

ते उत्तम कविता लिहायचे.

त्यांनी अनेक कविता लिहिल्या होत्या.

मी त्यांच्या मागे लागायचो,

“नाना, तुमच्या कविता आपण पुस्तकाच्या रूपात प्रकाशित करूया.”

नाना प्रचंड वाचायचे. साहित्यावर त्यांचं खूप प्रेम होतं.

त्यांच्या कविता प्रकाशित व्हाव्यात अशी माझी मनापासून इच्छा होती.

पण दुर्दैवानं ते पुस्तक कधी झालंच नाही.

आमच्यातल्या अपूर्ण राहिलेल्या संवादांपैकी हा एक संवाद माझ्या मनात कायम राहील.

नाना पाटेकर आणि मित्र भोजनाच्या टेबलावर गप्पा मारताना
नानांसोबतचे निवांत क्षण आणि संवाद.

२०१६… शेतकरी, Farmers App आणि NAAM

नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या NAAM Foundationचं शेतकऱ्यांसाठीचं काम आमच्यासाठी खूप प्रेरणादायी होतं.

आम्ही शेतकऱ्यांसाठी एक App विकसित केलं आणि त्याच्या उद्घाटनासाठी नानांना विनंती केली.

त्यांनी आनंदानं होकार दिला.

एकेकाळी विद्यार्थी म्हणून आमच्या कार्यक्रमाला येण्याची विनंती करणारा मी, आता शेतकऱ्यांसाठीच्या एका उपक्रमासाठी त्यांना विनंती करत होतो.

आणि पुन्हा एकदा नाना एका चांगल्या कामामागे उभे राहिले.

Farmers Org उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंदार जोगळेकर आणि नाना पाटेकर
NAAM Foundation च्या पाठिंब्याने Farmers Org उपक्रम.

आणि वर्तुळ पुन्हा साखरप्यात पूर्ण झालं…

माझ्या या संपूर्ण गोष्टीतला सर्वांत विलक्षण योगायोग कदाचित हा आहे.

माझी गोष्ट कुठून सुरू झाली?

साखरपा. १९८३. पूर.

ज्या नदीच्या पुरानं आमच्या कुटुंबाचं छोटंसं दुकान वाहून नेलं होतं, त्या साखरप्यात पुढेही दरवर्षी पावसाळ्यात पुराचा प्रश्न निर्माण होत असे.

अनेक वर्षांनंतर NAAM Foundationच्या मोठ्या मदतीने नदीतील गाळ काढण्याचं काम झालं आणि पुराची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली.

तेव्हा मला वाटलं,

आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं.

ज्या पुरानं माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली…

त्या परिस्थितीतून मी पुण्याला आलो…

पुण्यात हार मानून परत जाण्याचा विचार करत असताना नानांच्या प्रहारनं मला लढण्याचं बळ दिलं…

आणि अनेक वर्षांनी त्याच नानांनी उभ्या केलेल्या नाम संस्थेचा हात माझ्या त्याच गावातील, त्याच नदीच्या समस्येवर उपाय करण्यासाठी पोहोचला.

काही योगायोगांना शब्दांत सांगणं कठीण असतं.

पावसाळ्यात काजळी नदीचे पात्र आणि नदीकाठ
काजळी नदीचे पावसाळ्यातील दृश्य.
काजळी नदीचे दृश्य. व्हिडिओ उघडा

२०२०… BookGanga आणि पुस्तकप्रेमी नाना

पुढे BookGanga International Book Store, Deccan Gymkhana, Pune मध्ये नाना येऊ लागले.

BookGanga उभं केल्याचा त्यांना खूप आनंद होता.

ते भरपूर वाचायचे.

पुस्तकं पाहायचे.

मला पुस्तकं सुचवायचे.

आणि नेहमी विचारायचे,

“नवीन काय आहे?”

कधीकाळी एका अभिनेत्याला भेटण्यासाठी धडपडणारा विद्यार्थी आज स्वतः उभ्या केलेल्या पुस्तकांच्या दालनात त्यांच्यासोबत साहित्यावर गप्पा मारत होता.

हा प्रवास माझ्यासाठी खूप काही सांगणारा होता.

BookGanga पुस्तकांच्या दालनात नाना पाटेकर आणि सहकारी
BookGanga मधील पुस्तकप्रेमी नाना.

२०२४… नानांकडून आलेले आंबे

नाना त्यांच्या शेतावरून प्रेमानं आंबे पाठवायचे.

ही खूप छोटी गोष्ट वाटेल.

पण नाती अशाच छोट्या गोष्टींमधून जपली जातात.

दूर असताना कुणाला आपली आठवण झाली आणि त्यांनी आपल्या शेतातले आंबे प्रेमानं पाठवले…

माझ्यासाठी ते आंबे नेहमीच खास होते.

आणि तो अनमोल कप…

नानांनी दिलेली एक भेट मात्र माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे.

एक कप.

तो साधा कप नव्हता.

तो कप नानांना भारतीय सैन्याकडून भेट म्हणून मिळाला होता.

माझे वडील भारतीय सैन्यात होते, हे नानांना माहीत होतं. त्या पार्श्वभूमीचा मला किती अभिमान आहे, हेही त्यांना माहीत होतं.

भारतीय सैन्याकडून स्वतःला मिळालेली ती भेट त्यांनी स्वतःजवळ न ठेवता मला दिली.

आणि त्यावर स्वतःच्या हातानं लिहिलं,

“नाना”

मी माझ्या वडिलांना त्या कपाबद्दल सांगितलं.

वडिलांनाही नाना खूप आवडायचे.

नानांनी भारतीय सैन्याकडून मिळालेली भेट त्यांच्या मुलाला दिली आहे, हे समजल्यावर त्यांनी फार काही बोललं नाही.

माझ्या वडिलांनी नानांना फक्त सलाम केला.

तो सलाम मी कधीही विसरू शकणार नाही.

त्या एका कपात जणू तीन माणसं जोडली गेली होती.

माझे वडील.

नाना.

आणि मी.

आज त्या कपाकडे पाहिलं की फक्त नाना पाटेकर आठवत नाहीत.

१९८३ चा साखरप्याचा पूर आठवतो.

माझे वडील आठवतात.

त्यांचं सैनिकी आयुष्य आणि त्यांनी केलेला तो सलाम आठवतो.

विद्यार्थी सहाय्यक समिती आठवते.

प्रहार पाहणारा तो घाबरलेला तरुण आठवतो.

निर्मलाताई आठवतात.

समितीतली नानांची पहिली भेट आठवते.

न्यूयॉर्क ते फिलाडेल्फियाचा प्रवास आणि ते साधं सँडविच आठवतं.

BMM आठवतं.

कार्डिफचे जिम आठवते.

घरचा गणपती आठवतो.

त्यांच्या हातचा चहा आठवतो.

त्यांच्या अप्रकाशित कविता आठवतात.

शेतकरी आणि NAAM आठवतं.

साखरप्याची नदी आठवते.

BookGanga मधलं त्यांचं “नवीन काय आहे?” आठवतं.

त्यांनी पाठवलेले आंबे आठवतात.

आणि या सगळ्यापलीकडे त्यांचा तो प्रेमळ आवाज आठवतो…

“ मंदार बाळा, कसा आहेस?”

जगासाठी नाना एक महान अभिनेते होते.

माझ्यासाठी मात्र ते त्याहून खूप काही होते.

प्रेरणा.

मार्गदर्शक.

मित्र.

आणि कालांतराने एक प्रेमळ, वडीलधारं माणूस.

एका पुरानं माझ्या आयुष्याची दिशा बदलली.

एका चित्रपटानं त्या प्रवासात पुढे जाण्याचं धैर्य दिलं.

त्या चित्रपटामागचा माणूस पुढे माझ्या आयुष्याचा एक भाग झाला.

आणि अनेक वर्षांनी त्याच माणसाच्या सामाजिक कार्याचा हात पुन्हा माझ्या साखरप्यापर्यंत पोहोचला.

वर्तुळ पूर्ण झालं.

आज नाना नाहीत.

पण त्यांनी शिकवलेली जिद्द, साधेपणा, शिस्त, स्पष्टवक्तेपणा, समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती आणि कोणताही गाजावाजा न करता इतरांसाठी उभं राहण्याची त्यांची पद्धत कायम आठवत राहील.

आणि माझ्याकडे राहील तो अनमोल कप…

भारतीय सैन्याची भेट.

नानांनी मला दिलेली.

त्यांच्या हाताने “नाना” लिहिलेली.

नाना,

माझ्या वडिलांनी तुम्हाला सलाम केला होता.

मी तुम्हाला कृतज्ञतेनं नमस्कार करतो. 🙏

आणि मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तुमचा तो आवाज कायम ऐकू येत राहील…

“ मंदार बाळा, कसा आहेस?”

भावपूर्ण श्रद्धांजली, नाना! 🙏💐

भारतीय सैन्याच्या भेटीवरील OP MAITREE 28 आणि GUARDIANS OF THE LINE मजकूर
भारतीय सैन्याकडून नानांना मिळालेली, त्यांनी मला दिलेली भेट.
कपाच्या दुसऱ्या बाजूवरील OP SANGAM DIV आणि LINE OF CONTROL मजकूर
कपाची दुसरी बाजू.
कपाच्या तळावर लाल मार्करने लिहिलेली नानांची स्वाक्षरी
कपाच्या तळावर नानांच्या हातची स्वाक्षरी. माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा.